भडगावात नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

भडगावात नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा उत्साहात
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती; आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार
▶ भडगाव (वा.)
भडगाव शहराच्या राजकीय इतिहासात नवे पर्व अधोरेखित करत नवनिर्वाचित नगराध्यक्षा रेखा प्रदीप मालचे यांच्या पदग्रहणाचा सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका, शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान फुलांचा वर्षाव करण्यात आला.
दुपारी शहरातील नारायण मंगल कार्यालयात पदग्रहण व सत्कार समारंभ पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते नगराध्यक्षा रेखा मालचे व उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांच्या बचत गटांना सक्षम करण्यासाठी शहरात स्वतंत्र मॉल सुरू करण्यात येईल. या मॉलमध्ये बचत गटांनी तयार केलेल्या संसारोपयोगी वस्तूंना विक्रीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. पालिकेतील लोकप्रतिनिधींना विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम होत असून महिलांचा सन्मान व सहभाग ही बाब प्रेरणादायी आहे. एका झोपडीत राहणाऱ्या महिलेला नगराध्यक्षपदाचा मान मिळणे हे लोकशाहीचे जिवंत उदाहरण आहे. भडगाव नगरपरिषदेसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
नगरपरिषद प्रशासनातर्फे कार्यालयीन अधीक्षक राहुल लोखंडे यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे स्वागत केले.
कार्यक्रमास गटनेते लखिचंद पाटील, नगरसेवक डॉ. विजयकुमार देशमुख, विजयकुमार भोसले, इमरान अली सय्यद, अतुलसिंह परदेशी, शेख खलील शेख इजाज, देवाजी अहिरे, राहुल ठाकरे तसेच नगरसेविका रंजना वाघ, अंजुमन परवीन मिर्झा, करुणा देशमुख, किरण पाटील, योगिता येवले, समीक्षा पाटील, वैशाली पाटील, ज्योती आचारी, कल्पना भोई, वैशाली महाजन यांच्यासह पालिका अधिकारी, कर्मचारी व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



