जीवनशक्ती मायक्रो फायनान्सतर्फे महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर; स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल

जीवनशक्ती मायक्रो फायनान्सतर्फे महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर; स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल
पाचोरा | प्रतिनिधी
महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने जीवनशक्ती मायक्रो फायनान्स यांच्या वतीने पाचोरा येथे मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी मोफत शिवणकला तसेच मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होऊन आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
शिवणकला प्रशिक्षणात कपडे शिवणे, कटिंग, डिझाईनिंग आणि शिवणकामातील विविध तंत्र शिकविले जाणार आहे. तर ब्युटी पार्लर प्रशिक्षणामध्ये ब्युटी केअर, मेकअप, हेअर केअर तसेच पार्लर व्यवस्थापनाचे संपूर्ण मार्गदर्शन दिले जाणार आहे.
प्रशिक्षणासाठी इच्छुक महिलांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोफत प्रशिक्षणासाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
हे प्रशिक्षण पाचोरा येथील नवकार प्लाझा, मार्केटसमोर येथे आयोजित करण्यात आले असून, इच्छुक महिलांनी तातडीने नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीवनशक्ती मायक्रो फायनान्सच्या वतीने करण्यात आले आहे.
“आत्मनिर्भर महिला – सक्षम समाज, सशक्त भारत” या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम महिलांच्या कौशल्यविकासासह रोजगारनिर्मितीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे



