नांद्रा शिवारात म्हशींची धाडसी चोरी पाच म्हशी व दोन पारडू लंपास – अंदाजे ५ ते ६ लाखांचे पशुधन चोरीला

◾ नांद्रा शिवारात म्हशींची धाडसी चोरी पाच म्हशी व दोन पारडू लंपास – अंदाजे ५ ते ६ लाखांचे पशुधन चोरीला
### ◾ महिनाभरात दुसरी मोठी घटना; लासगावनंतर नांद्रातही चोरट्यांचा धुमाकूळ
*नांद्रा, ता. पाचोरा (प्रतिनिधी : प्रा. डॉ योगेश पाटील)*
नांद्रा–पहाण रस्त्यालगत नागोबा देवताच्या जवळील शेतशिवारात गुराढोरांच्या चोरीची धाडसी घटना उघडकीस आली असून, संजय रामराव तावडे यांच्या मालकीच्या तबेल्यातून पाच म्हशी व दोन पारडू अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत. या चोरीमुळे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे पशुधन लंपास झाले आहे.
घटनेच्या ठिकाणी आढळलेल्या चाकांच्या मागोवावरून महिंद्रा पिकअप, छोटा हत्ती व इतर वाहनांचा वापर करून तीन ते चार गाड्यांद्वारे ही चोरी करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधित तबेल्यात एकूण सुमारे ४५ लहान-मोठी जनावरे होती. मात्र वाहनांची मर्यादित व्यवस्था असल्याने चोरट्यांनी पाच म्हशी व दोन पाल्यांवरच हात साफ केला. उर्वरित तीन म्हशी वाहनाअभावी सोडून दिल्या गेल्या असून त्या पुन्हा मोकळ्या तबेल्यात परत आल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे, याच प्रकारची चोरी सुमारे एक महिन्यापूर्वी लासगाव शिवारात बांबरुड रस्त्यालगत घडली होती. तेथे सुधाकर पाटील यांच्या गट क्रमांक ३४२ मधून चार म्हशी व दोन पारडू चोरीला गेल्या होत्या. सलग दोन गावांमध्ये झालेल्या या घटनांमुळे संघटित टोळी सक्रिय असल्याची शक्यता बळावली आहे.
नांद्रा येथे चार दिवसांपूर्वी पाण्याच्या मोटारींची चोरी झाल्यानंतर आता गुराढोरांची धाडसी चोरी झाल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
घटनेचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, बीट हवालदार उमेश पाटील, पोलीस पाटील भूषण पाटील तसेच इतर पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पशुपालक संजय रामराव तावडे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
या भामट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.



