पोलीस स्टेशन’ पुरस्कार; पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली एका वर्षात विक्रमी कामगिरी

पोलीस स्टेशन’ पुरस्कार; पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली एका वर्षात विक्रमी कामगिरी
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी ६ जुलै २०२५ रोजी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका वर्षात गुन्हेगारीविरोधात प्रभावी मोहीम उभारून कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत केली आहे. अवैध शस्त्र, गुटखा, गांजा, दारू व जुगार माफियांविरोधात सातत्याने धडक कारवाया करत गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा जबरदस्त धाक निर्माण करण्यात यश मिळाले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पाचोरा पोलीस ठाण्याला ‘उत्कृष्ट पोलीस स्टेशन’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात संपूर्ण पोलीस पथकाने केलेल्या कामगिरीमुळे हा सन्मान मिळाला आहे.
६ जुलै २०२५ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत पोलीस ठाण्यात ९१७ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ७९१ गुन्ह्यांची मुदतीत उकल करण्यात आली असून, ८६.२५ टक्के गुन्हे निर्गती साध्य करण्यात आली आहे.
अवैध शस्त्रविरोधी मोहिमेत २८ तलवारी, ७ गावठी पिस्तुले, ११ जिवंत काडतुसे, १ कोयता, ३ चाकू-सुरे व १ चॉपर जप्त करण्यात आले. अवैध गुटखा आणि अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत ६८.४८ लाख रुपयांचा गुटखा व ४.२२ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.
चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये १५.६० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बेपत्ता व पळवून नेलेल्या व्यक्तींच्या सुमारे ९० टक्के प्रकरणांचा यशस्वी शोध घेण्यात आला.
गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत १४ जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, त्यापैकी ८ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. दारुबंदी कायद्यांतर्गत २०६ गुन्हे, जुगारविरोधात ७३ गुन्हे, तसेच एनडीपीएस कायद्यांतर्गत ३१ गुन्ह्यांची नोंद करून अनेक आरोपींना न्यायालयाकडून शिक्षा मिळवून देण्यात आली आहे.
सातत्यपूर्ण कारवाई, जलद तपास, प्रभावी नेतृत्व आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात पाचोरा पोलीस ठाण्याने केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे हा सन्मान प्राप्त झाला असून, भविष्यातही गुन्हेगारीविरोधातील कारवाया अधिक प्रभावीपणे सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



