पाचोरा तहसील कार्यालयात ‘हिरकणी कक्ष’चे लोकार्पण; स्तनदा मातांसाठी दिलासा

पाचोरा तहसील कार्यालयात ‘हिरकणी कक्ष’ाचे लोकार्पण; स्तनदा मातांसाठी दिलासा
पाचोरा | प्रतिनिधी
महिला व बाल विकास विभागाच्या पुढाकारातून पाचोरा तहसील कार्यालयात स्तनदा माता व लहान बाळांसह येणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी सुसज्ज ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात आला असून, या कक्षाचे उद्घाटन पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पासाहेब पाटील आणि पाचोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुनिताताई किशोर आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगर परिषदेतील महिला नगरसेविकाही उपस्थित होत्या.
उद्घाटनप्रसंगी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती काकुस्ते यांनी हिरकणी कक्षाचे महत्त्व विषद केले. तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी तसेच खरेदी-विक्रीसारख्या कामानिमित्त येणाऱ्या स्तनदा माता आणि लहान बाळांसह येणाऱ्या महिलांना सुरक्षित, स्वच्छ व गोपनीय वातावरणात बाळाला स्तनपान करता यावे, या उद्देशाने हा कक्ष सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी भूषण अहिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत, महसूल नायब तहसीलदार प्रमोद मोरे, संजय गांधी नायब तहसीलदार प्रतिभा राजपूत, पुरवठा नायब तहसीलदार सुषमा उरकडे, तालुक्यातील महिला ग्राम महसूल अधिकारी, महिला महसूल सेवक, नगरसेवक तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती काकुस्ते यांनी उपस्थित मान्यवर व सर्व उपस्थितांचे आभार मानले. हिरकणी कक्षामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या स्तनदा मातांना मोठा दिलासा मिळणार असून, महिलांसाठी अधिक संवेदनशील व सुविधायुक्त शासकीय सेवा उपलब्ध करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.



