आडळसे येथे लांडग्यांचा धुमाकूळ; दोन शेळ्या फस्त, शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी

आडळसे येथे लांडग्यांचा धुमाकूळ; दोन शेळ्या फस्त, शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी
भडगाव तालुका | वार्ताहर
भडगाव तालुक्यातील आडळसे परिसरात लांडग्यांचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत शेतकरी नाराज जयराम पाटील यांच्या शेतातील गोठ्यात घुसून लांडग्यांनी दोन शेळ्यांवर हल्ला करत त्यांचा फडशा पाडला. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास नाराज पाटील हे शेतातील काम आटोपून घरी गेले असताना लांडग्यांनी गोठ्याचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला. त्यांनी दोन शेळ्यांना ठार मारून त्यांचे लचके तोडले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक अहवालानुसार सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आडळसे, जुवार्डी, पिंपळगाव, शिंदी आदी गावांलगत मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असल्याने या भागात लांडगे, रानडुक्कर, हरीण, मोर, नीलगाय यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच पाळीव जनावरांचे वारंवार नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने लांडग्यांचा बंदोबस्त करावा, शेतालगत संरक्षण भिंत किंवा तारकुंपण उभारावे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत परिसरातील शेतकरी पी. एस. पाटील यांनीही वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाकडे लक्ष वेधत, शेतकरी व पाळीव जनावरांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.



