खान्देश

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या तरुणाची हत्या: आरोपींची जामनेर पोलिसांकडे शरणागती, शहरात तणाव कायम

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या तरुणाची हत्या: आरोपींची जामनेर पोलिसांकडे शरणागती, शहरात तणाव कायम

पाचोरा, ५ जुलै: पाचोरा शहरातील बसस्थानकाच्या प्रवेशव्दारासमोर काल, शुक्रवार, दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण पाचोरा शहर आणि तालुका हादरला आहे. श्री. छत्रपती शिवाजीनगर येथील २६ वर्षीय रहिवासी आकाश कैलास मोरे या तरुणावर अज्ञात मारेकऱ्यांनी सिनेस्टाईल बेछूट गोळीबार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे आजही पाचोरा शहरातील सामान्य नागरिक तणावाखाली आहेत.

गोळीबाराची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या आकाश मोरेचा मृतदेह पाचोरा येथील शासकीय रुग्णालयात पाठवून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या घटनेवेळी घटनास्थळी प्रचंड गर्दी उसळली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तातडीने पाचोरा शहरातील घटनास्थळी येऊन माहिती जाणून घेतली. त्यांनी पाचोरा पोलिसांना योग्य त्या सूचना देत जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले होते.


कायद्याची भीती नाही? आरोपींची जामनेर पोलिसांकडे शरणागती

घटना घडल्यानंतर गोळीबार करणारे आरोपी तात्काळ घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात शोधाशोध सुरू असतानाच, आकाश मोरेवर गोळीबार करणारे आरोपी निलेश अनिल सोनवणे (वय २७) आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार या दोघांनी काल रात्री अंदाजे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास स्वतःहून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊन शरणागती पत्करली. त्यांनी गोळीबार करण्यासाठी वापरलेले दोन पिस्तुल, एक दुचाकी आणि एक मोबाईल जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कासार यांच्याकडे जमा केले असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. आरोपींनी बिनधास्तपणे स्वतःहून जामनेर पोलीस स्टेशनला हजर झाल्याने या प्रकरणी उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत असून, या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.


पाचोऱ्यात भीतीचे वातावरण कायम, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

सद्यस्थितीत आकाश मोरेचे मारेकरी जामनेर पोलीस स्टेशनला हजर झाले असून, जामनेर पोलिसांच्या ताब्यात आहेत. जामनेर पोलीस मारेकऱ्यांकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असले तरी, आजही पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या अशा गोळीबाराच्या घटना घडत असतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button