पाचोरा तालुक्यात दिवसाढवळ्या धाडसी चोरी, कुऱ्हाड खुर्दमध्ये बंद घरातून लाखाची रोकड लंपास!

पाचोरा तालुक्यात दिवसाढवळ्या धाडसी चोरी, कुऱ्हाड खुर्दमध्ये बंद घरातून लाखाची रोकड लंपास
पाचोरा, जळगाव: तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे एका शेतकरी कुटुंबाच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेतकरी धनराज चौधरी हे आपल्या कुटुंबासह सकाळी शेतीच्या कामासाठी घराला कुलूप लावून गेले होते. दुपारी काम आटोपून घरी परतल्यावर त्यांना घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. घरात जाऊन पाहिले असता, घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि कपाटात ठेवलेली एक लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या घटनेने चौधरी कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन गाठून याप्रकरणी फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव शिरसागर, पोलीस हवालदार नामदेव इंगळे, राहुल बेहरे, अमोल पाटील, एएसआय अरविंद मोरे, अतुल पवार आणि शैलेश चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, परिसरातील काही संशयित लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोहारा दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत असून, लवकरच चोरट्यांना गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



