
पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा: ₹1.20 कोटींच्या अपहाराचे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याच्या हालचालींना वेग
पाचोरा, (प्रतिनिधी) – जळगाव: पाचोरा तालुक्यातील बहुचर्चित शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी आता नवे वळण आले आहे. तब्बल ₹1.20 कोटींच्या या अपहार प्रकरणाची चौकशी आता थेट आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पत्रकार संदीप महाजन यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणानंतर प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
काय आहे प्रकरण?
पाचोरा तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मंजूर झालेल्या अनुदानाच्या रकमेत मोठी अफरातफर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महसूल सहायक अमोल भोई याने संगणक प्रणालीत फेरफार करून अनेक पात्र शेतकऱ्यांची नावे वगळली आणि त्याजागी इतर लोकांची नावे घुसडून अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात वळवल्याचा आरोप आहे. अनेक शेतकऱ्यांनी अनुदान न मिळाल्याची तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक चौकशीत सुमारे ₹1.20 कोटी 13 हजार 517 रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
संदीप महाजन यांचे आमरण उपोषण आणि मागणी
या घोटाळ्यातील केवळ एका व्यक्तीवर कारवाई न होता, यामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस यावे, या मागणीसाठी पत्रकार संदीप महाजन यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. “फक्त अमोल भोई हा या घोटाळ्यातील एक छोटा मासा आहे. यामागे मोठे रॅकेट कार्यरत असून, जोपर्यंत या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) दिला जात नाही आणि खऱ्या सूत्रधारांना बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत मी मागे हटणार नाही,” अशी ठाम भूमिका महाजन यांनी घेतली होती. त्यांच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फुटली आणि प्रशासनावर दबाव वाढला.
आमदार किशोर पाटील यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता
संदीप महाजन यांच्या उपोषणाची आणि प्रकरणाची वाढती तीव्रता लक्षात घेता, स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी मध्यस्थी केली. त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन महाजन यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आणि दोषींना पाठीशी घातले जाणार नाही, असे ठोस आश्वासन आमदार पाटील यांनी दिले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही तपासाबाबत सकारात्मकता दर्शवल्यानंतर आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन संदीप महाजन यांनी आपले उपोषण मागे घेतले.
मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता ;
संदीप महाजन यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले. त्यांच्या निर्भीड भूमिकेमुळे आणि आता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याच्या शक्यतेमुळे या घोटाळ्यातील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात केवळ महसूल विभागातील कर्मचारीच नव्हे, तर इतर काही राजकीय व्यक्ती आणि दलालांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात या तपासाला मोठे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



