पारोळ्यात दखनी मराठा आणि सूर्यवंशी बारी समाजाला हक्काचे व्यासपीठ: आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

पारोळ्यात दखनी मराठा आणि सूर्यवंशी बारी समाजाला हक्काचे व्यासपीठ: आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न !
पारोळा, जळगाव: पारोळा शहरात श्री दखनी मराठा समाजासाठी मंजूर झालेल्या ३० लाख रुपयांच्या सामाजिक सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आणि सूर्यवंशी बारी समाजासाठी मंजूर झालेल्या २० लाख रुपयांच्या सामाजिक सभागृह बांधकामाचा लोकार्पण सोहळा आज आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. कुठल्याही समाजात लहान-मोठा असा भेद न करता, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा निर्धार आमदार अमोल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी शहरप्रमुख अमृत चौधरी, शहरसंघटक विनोद खाडे, दखणी मराठा समाज पंच मंडळाचे अध्यक्ष श्रावण मराठे, सूर्यवंशी बारी समाज अध्यक्ष मोतीलाल बारी, उद्योजक रवींद्र मराठे, संजय मराठे, पुंजु मराठे, संभाजी मराठे, संतोष मराठे यांच्यासह अनेक मान्यवर, श्री दखनी मराठा समाज व सूर्यवंशी बारी समाज पंच मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अमोल पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पारोळा शहरात दखनी मराठा समाज आणि सूर्यवंशी बारी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या समाजांकडून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे अशी मागणी होत होती. या मागणीची दखल घेत मा. आमदार चिमणराव पाटील यांनी यापूर्वी धोबी, नाथजोगी, गोसावी, नाभिक या समाजांना सामाजिक सभागृहाद्वारे हक्काचे व्यासपीठ मंजूर करून दिले. त्याच परंपरेत आज दखनी मराठा समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आणि सूर्यवंशी बारी समाज सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले, “मा. चिमणराव पाटील आणि मी गेल्या ४० हून अधिक वर्षांच्या राजकारणात कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही, कुणाला समाज विचारून जवळ केले नाही. आमची पूर्ण राजकीय कारकीर्द येथे बसलेली बरीच जुनी व नवीन मंडळी जाणून आहेत. आयुष्यात कधी हा समाज मोठा तो लहान असा भेदभाव केला नाही. समाजातील शेवटच्या घटकाला कसा न्याय देता येईल, हा विचार कायम अंगी बाळगला. त्यातूनच आज या समाजांना हक्काच्या वास्तू उपलब्ध होत आहेत.”
आमदार पाटील यांनी धोबी समाज, नाभिक समाज, नाथजोगी समाज, गोसावी समाज यासह प्रत्येक समाजाने विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवून दिल्याबद्दल आभार मानले. विशेषतः दखनी मराठा समाजाचे आभार मानताना ते म्हणाले की, या समाजाने फक्त माझ्या एका शब्दावर, आश्वासनावर निवडणुकीवेळी खंबीर साथ दिली. सामाजिक सभागृह म्हणजे काही मोठे काम दिले असे नाही, परंतु समाज संघटित होण्यासाठी आणि एकसंघ होण्यासाठी सामाजिक सभागृह हे व्यासपीठ खूप लाभदायक आहे.
येणाऱ्या काळात दोन्ही समाजांच्या काही मागण्या असतील त्या नक्कीच मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असून, येणाऱ्या काळातही दोन्ही समाजांची साथ आणि आशीर्वाद असेच पाठीशी असतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात दोन्ही समाजांकडून मिळालेल्या साथीबद्दल आमदार अमोल पाटील यांनी यावेळी आभार मानले.



