जळगाव जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; प्रमुख मागण्यांसाठी ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ची हाक नियोजन बैठकीचे १० सप्टेंबर रोजी आयोजन!

जळगाव जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; प्रमुख मागण्यांसाठी ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ची हाक
नियोजन बैठकीचे १० सप्टेंबर रोजी आयोजन !
जळगाव: जिल्ह्यातील आणि राज्यभरातील शेतकरी कापूस, केळी, सोयाबीन आणि इतर पिकांच्या गंभीर परिस्थितीमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि आपल्या प्रमुख मागण्या मांडण्यासाठी ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी दिनांक १० सप्टेंबर, बुधवार रोजी सकाळी १० वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कापूस, केळी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि शासनाच्या धोरणांमुळे त्रस्त झाले आहेत. अनेक समस्यांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात येत असल्याचे ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा समिती’ने म्हटले आहे.
मोर्चाच्या प्रमुख मागण्या:
सरसकट कर्जमाफी: निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी.
फळ पीक विमा: फळ पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी.
पीक विमा योजनेचे निकष: कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, मका इत्यादी पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे जुने निकष पुन्हा लागू करावेत.
शेतीमालाला भाव: उत्पादित शेतमालाला योग्य भाव मिळावा.
आयात शुल्क: शासनाने कापूस पिकावरील आयात शुल्क रद्द केल्याने होणारे नुकसान थांबवावे.
नुकसान भरपाई: पावसाचा खंड आणि मागील पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे जे मोठे नुकसान झाले आहे, त्याची तातडीने भरपाई मिळावी.
या सर्व गंभीर समस्यांवर चर्चा करून मोर्चाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही नियोजन बैठक बोलावण्यात आली आहे. हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून केवळ शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा समिती, जळगाव’ यांनी केले आहे.



