डेंग्यु प्रतिरोध उपाययोजना : एक दिवस एक कार्यक्रम.

0 23

डेंग्यु प्रतिरोध उपाययोजना : एक दिवस एक कार्यक्रम

जळगांव, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : आरोग्य विभाग तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने सर्व तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी व वैदयकिय अधिकारी यांना जिल्हयात डेंग्यू ताप वाढणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक व नियंञणात्मक उपाययोजना राबविण्यात सूचना दिल्या आहेत. डेंग्यूविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रिय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांद्वारे जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्रात व शहरी भागात नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे याकरिता पूर्ण महिनाभरात ‘एक दिवस-एक कार्यक्रम’ घेण्यात येणार आहे. 
या कार्यक्रमात दिलेल्या तारखेला जलद ताप सर्वेक्षण, प्रदर्शनाचे आयोजन, सर्व स्तरावर रॅलीचे आयोजन, गप्पी मासे सोडणे, डेंग्यू ताप आजाराविषयी सर्व ठिकाणी सभाचे आयोजन, दिंडया, प्रभात फेरी, चिञकला स्पर्धा, हस्तपञिका वाटप, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू या विषाणूमुळे होतो. एडिस इजिप्ताय डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित होतो. हा एक तीव्र फ्ल्युसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासांच्या चाव्यानंतर 5 ते 6 दिवसांनंतर मनुष्याला हा आजार होतो. या आजाराचे दोन प्रकार आहेत–डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
डेंग्यू तापाची लक्षणे–डेंग्यू ताप-लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठया माणसांमध्ये अधिक तीव्र स्वरुपाचा ताप, डोकेदुखी, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचे चट्टे येऊ शकतात. अंगदुखी तीव्र स्वरुपात असू शकते. म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.
डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप–डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा गंभीर स्वरुपाचा प्रकार असून यात तापाबरोबर बाहय रक्तस्त्राव, चट्टे उठणे, हिरडयांमधून रक्तस्त्राव, अंतर्गत रक्तस्त्राव, आतडयांमधून रक्तस्त्राव, प्लेटलेटची संख्या कमी होणे, इ. लक्षणे आढळून येतात. तसेच छातीत व पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणे असतात.
डेग्यू तापाचा प्रसार–आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू (एडीस इजिप्ती) जातीच्या डासाच्या मादीमार्फत दुस-या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. हे डास साधारणपणे समुद्रसपाटीपासून एक हजार मीटरपर्यंतच्या भागात जिवंत राहतात. याच्या साथी वेगाने पसरु शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे चट्टे असतात. त्याचा आकार अंदाजे 5 मिली मीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला 7 ते 8 दिवस घेतो. नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हा डास दिवसा सकाळी अथवा संध्याकाळी चावतो. हा आजारा संसर्गजन्य नाही.
औषधोपचार-रुग्णाने ताप असेपर्यंत आराम करावा. ताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये (4 ते 5 दिवसांपेक्षा जास्त). त्यानंतर किंवा त्यापूर्वी रुग्णाला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा खाजगी दवाखान्यात त्वरीत घेऊन जावे. निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयाचा भरपूर उपयोग करावा (क्षार संजीवनी), रक्तस्त्राव किंवा शॉकची (झटके) लंक्षणे असल्यास रुग्‍णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे. या विषाणूवर प्रतिजैविके उपलब्ध नाहीत. तेव्हा गंभीर स्वरुपाच्या आजाराच्या वेळी शहानिशा करुन रुग्णाला वेळेत दवाखान्यात नेल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात.
प्रतिबंधात्मक उपाययोजना–डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला पसरण्यापासून थांबवू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळच्या वेळी साठलेले पाणी रिकामे करणे, भारित केलेल्या मच्छरदाण्या वापरणे, अंगाला डास प्रतिबंधम मलम लावणे, रिपेलन्ट वापरणे.
वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही, व डास चावणार नाही. म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला डेंग्यू आजारापासून दूर ठेवेल. त्यासाठी किटकजन्य आजारांवर नियंत्रण होण्यासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.