जळगाव जिल्हापाचोरा-भडगाव

एक नारी अन्यायग्रस्त महिलांच्या समस्या सोडवण्याचे काम करी- शैक्षणिक क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना आधार देऊन मदत करण्याची संकल्पना हीच खरी

व्यक्तीमत्व विशेष
*एक नारी अन्यायग्रस्त महिलांच्या समस्या सोडवण्याचे काम करी- शैक्षणिक क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना आधार देऊन मदत करण्याची संकल्पना हीच खरी* 💐
पाचोरा – येथील कालिकानगर मधील रहिवासी असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. ललिता पाटील यांनी आपल्या जीवनात लहानपणापासून यांची उत्कृष्ट बोलण्याची पद्धत उत्कृष्ट अभ्यास, तसेच त्यांचे वडील कै. शिवाजी रतन पाटील प्राथमिक शिक्षक अंदरसुल, ता. येवला. यांचे मूळ गाव उपखेड, तालुका चाळीसगाव असून ‘आदर्श शिक्षक’, ‘समाजरत्न पुरस्कार’ प्राप्त असून त्यांनी मुलाला डॉक्टर बनवण्यासह मुलींना उच्च शिक्षण देऊन समाजापुढे मान-सन्मानाचा दर्जा दिला. डॉक्टर मुलासह सुनबाई सुद्धा डॉक्टर असून …मुलगी सौ. ललिता पाटील यांचे शिक्षण पदव्युत्तर एम.ए. इंग्रजी, असून विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण आहे. त्यांनी सरकारी नोकरीसाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले नाही म्हणून त्यांनी हार न मानता आपण समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून त्यांनी समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. ललिता पाटील यांनी शालेय जीवनात शिक्षणासोबत क्रीडा, वकृत्व, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धात भाग घेऊन त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांचे सासर भडगाव तालुक्यातील पांढरद येथील असून त्यांचे सासरे व्यवसायाने पशुवैद्यकीय डॉक्टर व सेवानिवृत्तीनंतर एक प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ख्याती होती. ललिता पाटील यांचा पाचोरा येथील कालिका नगरमध्ये रहिवास आहे. त्यांना सामाजिक कामाची आवड असल्यामुळे त्यांनी महिला संघटनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल वरिष्ठ पातळीवर महिला संघटनांनी घेऊन त्यांना राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली. या संघटनच्या माध्यमातून सौ ललिता पाटील यांनी महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महिलांवरील एखादा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असला की दोघाकडील बाजू व्यवस्थित समजून सामोपचाराने ठामपणे बाजू मांडून प्रश्न मार्गी लावतात. सौ. ललिता पाटील यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनच्या जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून पाच ते सात वर्षे काम केले असून त्या काळातही त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. त्यांची ही प्रगती पाहून काही त्यांचे हितचिंतक विरोध करू लागले. पण त्यांच्या पाठीशी त्यांचे पती व त्यांचे नातेवाईक खंबीरपणे उभे राहीलेत. यामुळे सौ. ललिता पाटील या अधिक खंबीरपणे उभे राहून आपले कार्य पुढे चालू ठेवले. त्यांनी 2010 मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच काबाडकष्ट करून मुलांचे संगोपन, शिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्वसामान्य घरातील महिलांचा गौरव केला. सौ. ललिता पाटील या उत्तम समुपदेशक आहेत. लवकरच ते आपल्या सर्वांच्या सेवेसाठी समुपदेशन केंद्र सुरू करणार असून त्यामाध्यमातून अनेक उपक्रम करण्याचा त्यांचा निर्धार आहे. सौ. ललिता पाटील या पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या महिला दक्षता समिती सदस्य असून त्यांनी यामार्फत अनेक महिलांना न्याय देऊन पती-पत्नीमधील होणारे वादविवाद टाळले व त्यांचा संसार जोडण्यासाठी प्रयत्न करीत असतात. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगारासह बचत गट योजनेचे फायदे मिळवून दिले आहेत. कोणाला शिवण यंत्रे, तसेच गृह उद्योग मशीन उपलब्ध करून कुटुंबाला हातभार लागेल असे रोजगारक्षम स्वावलंबी बनविले आहे. काही महिलांना घरगुती व्यवसाय साठी बचत गटाचे कर्ज देऊन रोजगार उपलब्ध करून दिला. हे सर्व करीत असताना त्यांनी आपल्या परिवाराकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यांचे पती खासगी नोकरीत असून त्यांची मुलेही उच्च शिक्षण घेत आहेत. संसारिक जबाबदारी सांभाळून आपल्या समाजसेवेचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल सन 2010 मध्ये सकाळ समूहातर्फे तेजस्विनी गौरव सन्मान, तर 2014 मध्ये माधव बहुउद्देशीय समूहाच्या ‘तरुण भारत’ च्या नवदुर्गा या कार्यक्रमातही त्यांना गौरवण्यात आले होते. विद्यादान संदर्भात गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य इंग्रजी विषय मार्गदर्शन व संस्कारही दिलेत. आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा अभ्यास तयारी करणाऱ्या गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली. सौ. ललिता पाटील यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे पाचोरा येथील  असलेल्या शैक्षणिक ‘ अकॅडमीत’ त्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ‘अकादमी’चे संचालक व संचालिका यांचा कुटुंबियांकडूनही त्यांचा वेळोवेळी अनेक बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला आहे. सौ. ललिता पाटील यांनी नेहमीच ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे, अशांना कुठलाही स्वार्थ वा कोणाकडून कौतुकाची अपेक्षा न ठेवता इतरांच्या आनंदात त्या आपला आनंद मानतात. महिलांच्या सुखदुःखात नेहमी साथ देत असतात. नवरात्र उत्सवात हिरारीने भाग घेऊन महिलांना व मुलींना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करीत असतात. कधीही आपल्या नशिबाला दोष न देता कर्म आणि देवावर त्यांचा विश्वास आहेे. आपण दुसऱ्याचे चांगले केले, तर आपलेही चांगले होते. असा त्यांचा स्वकर्तृत्वावर पूर्णपणे विश्वास आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, *एक पाऊल पडते पुढे, सौ ललिता पाटील सामाजिक कार्यात चोहीकडे।*

*शब्दांकन:-अनिल(आबा)येवले- पत्रकार पाचोरा

Related Articles

Close