अमळनेर-चोपडाक्राईम जगतजळगाव जिल्हापाचोरा-भडगाव

सत्रासेन परिसरातून गावठी कट्टे घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक ….

तिघे युवक पाचोरा येथील असल्याची माहिती!

# सत्रासेन परिसरातून गावठी कट्टे घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक ….
चोपडा प्रतिनिधी :—
सत्रासेन गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खामखेडा तीन रस्त्यावर गुप्त माहितीच्या आधारे चोपडा ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांनी पोलिस हवालदार लक्ष्मण शिंगाणे, पोलिस नाईक रितेश चौधरी यांना सोबत घेऊन मध्य प्रदेशातील पारची उमर्टी येथून मोटारसायकलवर गावठी कट्टा घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक केली आहे.
तीन युवक गावठी कट्टा घेवून येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पारची उमर्टी कडून येणारी मोटारसायकल क्रमांक एम.एच.१९ डी. क्यू ५७७६ वरील निलेश सोनवणे (वय २१) यांच्या जवळ पंचवीस हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा सह एक मॅगझिन आढळून आला. तर दुसरा आरोपी आप्पा कोळी (वय २०) याच्याकडे चार हजार रुपये किम्मतीचे चार जिवंत काडतुसे सापडले असून तिसरा आरोपी आकाश सोनवणे (वय २०) याच्या जवळील पंचवीस हजार रुपये किम्मतीचे एक गावठी पिस्तूल व रिकामी मॅगझिन आढळून आले. तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडील मोटारसायकल अंदाजित किंमत तीस हजार रुपये व वीस हजार रुपये किमतीचे दोन ॲन्ड्रॉईड मोबाईल असे एकूण ८१५०० रूपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदर तीनही आरोपी पाचोरा येथील रहिवासी आहेत. सदर आरोपी विरूद्ध पो. ना.रितेश चौधरी यांनी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हे कॉ लक्ष्मण शिंगाणे करत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गावठी कट्टा तस्करीच्या घटना थांबविण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान असून त्यासाठी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहेत….

Related Articles

Close