“खडकवासला धरणात सांडपाणी सोडले”
पुणे (प्रतिनिधी): खडकवासला धरणाच्या परिघात मोठ्या प्रमाणावर झालेल्या नागरीकरणामुळे धरणाला मिळणाऱ्या जलस्रोतांमधून गावोगावची गटारगंगा थेट धरणाच्या पाण्यात मिसळते आहे. पिण्याच्या पाण्यात थेट मैलापाणीच मिसळू लागल्याने भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. वाढते गृहप्रकल्प, फार्म-हाउस, पर्यटन या सगळ्याचा हा एकत्रित परिणाम आहे. धरणाच्या काठालगत झालेल्या बांधकामांमुळे या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे.
धरणाच्या दोन्ही बाजूच्या गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. मैलापाणी व्यवस्थापनाचा अभाव असल्याने पुणेकरांच्या आरोग्याशी होणाऱ्या या खेळाची जबाबदारी कोणाची असा प्रश्न आहे. महापालिकेने नव्याने २३ गावे आपल्या हद्दीत समाविष्ट करून घेतली. मात्र, त्यापूर्वी या भागातील गावांमधल्या या परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामपंचायत, त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि आता महानगरपालिका असा या गावांचा प्रवास असल्याने मैलापाण्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी या व्यवस्थांनी का घेतली नाही, हा कळीचा मुद्दा आहे.
खडकवासला धरणाच्या परिसरातील गावांमध्ये सरसकट बांधकामे झाली आहेत. महापालिका येण्याची कुणकुण लागली त्याचवेळी ग्रामपंचायतींकडून परवानगी घेऊन अनियंत्रित बांधकामे झाली. खडकवासल्यापुढील गोऱ्हे, डोणजे, खानापूर, वरदाडे इथे मैलापाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. डोणजे फाट्यावर मैलापाणी थेट रस्त्यावरच वाहते आहे.
खडकवासला परिसरात नागरीकरण होत असूनही गावांतल्या मैलापाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. प्राथमिक पातळीवरच ते होणे आवश्यक होते. या दूषित पाण्यामुळे वॉटरबॉडीवर गंभीर परिणाम होणार आहेत.