गुंड किरण हजारेसह तेरा जणांवर मोक्का

0 82

कोपरगाव येथील कुख्यात गुंड किरण माधव हजारे याच्यासह त्याच्या तेरा साथीदारांवर मोक्का अतंर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली आहे. हजारे याच्यासह त्याच्या साथीदारांवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरवडा, जबरी चोरी, फसवणूक, मारहाण, वाळूतस्करी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
कोपरगाव तालुका पोलीसांनी हजारे टोळीविरोधात मोक्कातंर्गत कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. शर्मा यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे मंजूरीसाठी पाठविला होता. या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. हजारे व त्याच्या साथीदारांवर कोपरगाव शहर, ग्रामीण, शिर्डी, शिरूर, कोतवाली आदी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तेरा गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील २० गुन्हेगारी टोळ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. मागील आठवड्यात राहुरी येथील वाळूतस्करांची टोळी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.