newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

आता सेटटॉप बॉक्स साठी ही ‘केवायसी’

- Advertisement -

आता सेटटॉप बॉक्स साठी ही ‘केवायसी’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) टीव्हीवरील मनोरंजनासाठी ‘डायरेक्ट टू होम’चा (डीटीएच) वापर करणाऱ्या ग्राहकांना आता त्यांच्या सेटटॉप बॉक्ससाठी बँकांच्या धर्तीवर ‘नो युअर कस्टमर’च्या (केवायसी) अर्जांतर्गत सर्व माहिती द्यावी लागणार आहे. केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळातर्फे (ट्राय) सेट टॉप बॉक्ससाठी ‘केवायसी’ बंधनकारक करण्यात येणार असून, याद्वारे डीटीएच वापरणाऱ्या ग्राहकांची सर्व माहिती संकलित केली जाणार आहे. सेट टॉप बॉक्सची होणारी तस्करी आणि सुरक्षेच्या कारणास्तव ‘ट्राय’ हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
यासंदर्भात नुकताच ट्रायकडून ‘कन्सल्टेशन पेपर’ जाहीर करण्यात आला आहे. त्यावर देशभरातील डीटीएच कंपन्या, ब्रॉडकास्टिंग तज्ज्ञांच्या सूचना आणि मते मागवण्यात आली आहेत. या प्रक्रियेनंतर ट्रायकडून केवायसी अत्यावश्यक करण्याचा निर्णय घेण्यात येईल. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केवळ नवीन डीटीएच कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, राहता पत्ता असलेले टेलिफोन किंवा विजेचे बिल अशा कागदपत्रांच्या आधारे केवायसी पूर्ण केली जाईल. या प्रक्रियेसाठी एक अॅप तयार करण्यात येणार असून, या अॅपद्वारे ग्राहकांची माहिती एकत्र केली जाणार आहे. पुढील टप्प्यामध्ये सध्या जे ग्राहक डीटीएच वापरतात त्यांची केवायसी प्रक्रियाही पूर्ण करणार असल्याचे ट्रायकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


सध्याच्या परिस्थितीत कोणीही नागरिक किंवा व्यक्ती डीटीएच कंपन्यांशी संपर्क साधून डीटीएच कनेक्शन घेऊ शकतो. एका व्यक्तीने किती कनेक्शन्स घ्यावीत, अथवा सेट टॉप बॉक्स घ्यावेत, यावर कोणतेही नियंत्रण नाही. यामुळे तस्करीही होऊ शकते. म्हणूनच केवायसी प्रक्रिया राबवण्याचा मुद्दा पुढे आला आहे. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश सुरक्षा आणि तस्करीपासून बचाव असल्याचे ट्रायने स्पष्ट केले आहे. अनेकदा भारतातील डीटीएच कंपन्यांचे सेट टॉप बॉक्स आणि इतर उपकरणांची तस्करी करून त्याचा गैरवापर होत असल्याचे लक्षात आले आहे. त्याला आळा घालण्यासाठी डीटीएच सुविधेचे ग्राहक वापरत असलेल्या प्रत्येक सेट टॉप बॉक्सची नोंद ट्रायकडे असावी, असा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे देशातील सर्व डीटीएच कंपन्यांशी सविस्तर चर्चा करून ही प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया केवळ एकदा न राबवता काही ठरावीक काळानंतर ती सतत राबवण्याचा विचारही ट्रायकडून केला जात आहे.

- Advertisement -

अशी होईल प्रक्रिया

सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नव्या कनेक्शनधारकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ज्यामध्ये विविध कंपन्यांच्या अॅपमार्फत ग्राहकाची वैयक्तिक माहिती भरून घेतली जाईल. ज्या व्यक्तीच्या नावावर कनेक्शन आहे, त्या व्यक्तीचा लाइव्ह फोटोही या अॅपमध्ये जोडला जाईल. शिवाय व्यक्तीची कागदपत्रे अॅपमध्ये स्कॅन करून सर्व डेटाबेस डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येईल. केवायसी शिवाय कोणालाही नवे कनेक्शन दिले जाणार नाही.
या कागदपत्रांची आवश्यकता
डीटीएचच्या केवायसी प्रक्रियेसाठी पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, घराचा पत्ता असलेले वीज अथवा फोनचे बिल ही कागदपत्रे लागणार आहेत.

केवायसीद्वारे ग्राहकांची ओळख पटवण्याचा आमचा हेतू आहे. सध्या देशातील डीटीएच साधनांच्या विक्रीवर कोणाचाही अंकुश नाही. यामुळे तस्करीच्या अनेक घटना गेल्या काही काळामध्ये समोर आल्या आहेत. या शिवाय सुरक्षेच्या दृष्टीनेही या उपकरणांचा गैरवापर होऊ नये, या हेतूने नवी प्रणाली अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. ग्राहकांसाठी ही प्रक्रिया अत्यंत सुलभ असेल, यासाठी प्रयत्न करू.

  • एस. के. गुप्ता, सचिव, केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळ (ट्राय)

- Advertisement -