Home जळगाव जिल्हा खाकी वर्दिचा असाही आदर्श :

खाकी वर्दिचा असाही आदर्श :

खाकी वर्दिचा असाही आदर्श : (वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान शिबिर)

भडगाव : राकेश पाटील
सध्या वाढदिवस साजरे करण्याचे फॅड खूपच वाढलेले आहे .केक कापून , पाटर्या करून वाढदिवस साजरे केले जातात . मात्र रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तदानाचे महान काम करण्यास प्रवृत्त करून वाढदिवस साजरा करणे म्हणजे खरोखर एक वेगळा आदर्शच म्हणावा लागेल . पोलीस हे जनतेचे संरक्षण करणारे देवदूत मानले जातात. पोलीस अन जनता यांची सामाजीक दृष्टया माणुसकीच्या नात्याची नाळ जुळलेली आहे. भडगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले हवालदार विलास पाटील एक सोज्वळ व्यक्तीमत्व असलेले व्यक्ती. त्यांचा नुकताच वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला. मित्र परीवाराने त्यांचा वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम करण्याचे ठरविले. मात्र त्यांनी आपल्या वाढदिवसाला रक्तदान शिबीर करण्याचे ठरविले. आपण जनतेचे रक्षक आहोत. जनतेचा अन पोलीसांचा समन्वय कायम राहावा. जनतेचे अन पोलीसांचे नाते काय असते. हे पाहता रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. आपल्यासह मित्रांच्या रक्तदानाने दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचण्यास मदत होईल. या भावनेने भडगाव पोलीस स्टेशन व मित्र परीवारामार्फत भडगाव पोलीस स्टेशन समोर विलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. हवालदार विलास पाटील यांचा ५१ वा वाढदिवस होता म्हणुन पोलीस कर्मचाऱ्यांसह मित्र परीवारामार्फत फक्त ५१ जणांचेच रक्तदान करण्यात आले. खाकी वर्दितल्या पोलीसाने केले वाढदिवसाला रक्तदान शिबिराचे आयोजन यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये पोलीस अन जनतेचे अतुट नाते गुंफलेले आहे. असे या कार्यक्रमावरुन दिसुन आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे ही आवर्जुन उपस्थित राहीले. हवालदार विलास पाटील यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या अन गळाभेटही घेतली . उपस्थित सारे आचंबीत झाले. तेव्हा कळाले कि, आमदार किशोर पाटील व हवालदार विलास पाटील हे बालमित्र अन वर्गमित्र. एवढेच नव्हे तर आमदार किशोर पाटील व हवालदार विलास पाटील हे पोलीस खात्यात पोलीस म्हणुन सोबत भर्ती झाले. सोबत पोलीस खात्यात नोकरीही केलेली असुन चांगले मित्र आहेत. पोलीस मित्राच्या वाढदिवसाला आमदार पोलीसाची गळा भेट. असे या दोन मित्रांच्या प्रेमाची झालर या रक्तदान, रक्ताचे नाते, पोलीसाचे जनतेचे अतुट नाते सारे काही सांगुन जाते.
हवालदार विलास पाटील हे पाचोरा तालुक्यातील रहिवाशी आहेत. आमदार किशोर पाटील व विलास पाटील काॅलेजपासुन सोबतचे बाल मित्र होते. दोघेही कुस्त्या खेळायचे. किशोर पाटील व विलास पाटील हे जिल्हास्तरावर कुस्त्या स्पर्धांमध्ये चमकले आहेत. दोघेही जळगाव येथे दि. १/१/१९९४ ला पोलीस भर्ती झाले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला ८ वर्ष पोलीसाची सोबत नोकरी केली होती. किशोर पाटील यांचे काका माजी आमदार आर.ओ.पाटील हे पाचोऱ्याचे आमदार होते. किशोर पाटील यांनी पोलीसाची नोकरी सोडुन राजकारणात प्रवेश केला. राजकारण, समाजकारणात सक्रीय होत आपल्या ताकदीला, मेहनतीला यश आले. अन पोलीसाची नोकरी सोडलेले किशोर पाटील पाचोरा भडगावचे आमदार बनले. दोनदा आमदार बनले. परंतु जिल्हयात पोलीस दलात काम करणाऱ्या मित्रांच्या सुख दुखात आजही आमदार किशोर पाटील धावुन जातात. पोलीस खाते अन पोलीस मित्र यांचेशी आमदार रुपी पोलीस किशोर पाटील यांचे मित्रत्व, प्रेमाचे नाते आजही गुंफलेलेच आहे. दोस्त हो तो ऐसा हो असे या दोघा पोलीस मित्रांच्या प्रेमावरुन दिसुन आले.
भडगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस हवालदार विलास पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भडगाव पोलिस स्टेशन आवारात भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता. हवालदार विलास पाटील यांचा ५१ वा वाढदिवस असल्याने ५१ लोकांनी रक्तदान करावे असे उद्दिष्ट भडगाव पोलिस स्टेशन मार्फत ठेवण्यात आले होते.
५१ व्यक्तींचे रक्तदान शिबीर व्यवस्थित रित्या पार पडले. रक्तदान शिबिराचा ठेवण्यात आलेला मानस पूर्ण करण्यात आला. रक्तदान शिबिर हे रेड प्लस ब्लड सेंटर, जळगाव यांच्या नियोजनात पार पडले. रक्तदान शिबिरात तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक अशोक ऊतेकर, वैद्यकीय अधिकारी डाॅ.साहेबराव अहिरे हे तसेच भडगाव शहरातील सर्वपक्षीय नागरिक, पोलीस मित्र, ट्रस्टी उपस्थित होते. भडगाव पोलिस स्टेशन मार्फत आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर हे आतापावेतो चे प्रथमच रक्तदान शिबिर होते. सदर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार विलास पाटील यांचा वाढदिवस आगळावेगळा साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिराचे मुख्य आयोजन भडगाव पोलिस स्टेशनचे गोपनीय पोलीस अंमलदार स्वप्नील चव्हाण यांनी त्यांचे पोलीस मित्रांमार्फत केले होते.
फोटो —
भडगाव येथे हवालदार विलास पाटील यांना शुभेच्छा देतांना आमदार किशोर पाटील बाजुला पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, डाॅ. साहेबराव अहिरे, स्वप्नील चव्हाण आदि.